जळगाव, दि. 19 – संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन आयोजित ‘भावांजली महोत्सवात’ सातव्या दिवशी अहिराणी बोलीतील सादरीकरणाने रसिकांना पोट धरून हसवले. धुळे येथील प्रा योगिता पाटील यांनी ‘तुन्हं मन्हचं तोंड शे’ हे कथाकथन सादर केले. रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांनी माणसांच्या स्वभावाचे चित्रण अचुक उभे केले. या कथाकथनाला विनोदासोबत प्रेक्षकांना भावगंभीर करत विचार करायला लावले. अतिशय सुरेख पद्धतीने योगिता पाटील यांनी हे कथाकथन सादर केले.
यानंतर ‘आयतं पोयतं सख्यानं’ या अहिराणी बोली भाषेतील धमाल विनोद एकपात्री प्रयोग रसिकांना पोट धरून हसवले. खान्देशातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या या भाषेतील गमती जमती, आपल्या बोलीभाषेविषयीचा लोकांच्या मनातील न्युनगंड यावर प्रकाश टाकत बोलीभाषेचा अभिमान बाळगा. मराठी सोबत अहिराणी जगली तरच मराठीही जगू शकते हे त्यांनी पटवून दिले. खान्देशासह महाराष्ट्रभर गाजलेला हा नाट्यप्रयोग अभिनेते प्रविण माळी यांनी सादर केला.
लग्नातील गमती जमती, सुख दुःखाचे प्रसंग रंगवताना त्यांनी आवाजातील बदलांनी संपूर्ण खान्देशाचं दर्शन घडवलं. परिवर्तनच्या भावांजली महोत्सवातील अहिराणी कथाकथन व एकपात्री प्रयोग पहायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत सुर्यवंशी, विनोद देशमुख, जेष्ठ पत्रकार हेमंत अलोने प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया, अनिष शहा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नारायण बाविस्कर, छबिराज राणे उपस्थित होते. सुत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले. महोत्सवाचा समारोप रविवारी होणार असून जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.