भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील आनंदनगर परिसरात गुरुवारी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास इन्व्हर्टर बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने एका घराला आग लागली. या आगीत घरातील गादी, चादरी आणि इतर साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
आनंदनगर येथील पुरुषोत्तम गाजरे यांच्या घरी ही घटना घडली. इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट होताच आगीने लगेचच रौद्ररूप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि अग्निरोधक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात केली. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याआधीच आगीवर नियंत्रण मिळवता आलं.
काही वेळातच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी उर्वरित आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. बॅटरीच्या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीती आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन पथकाच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.