जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दिनांक १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीपिके आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे हाल झाले असून, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
या मागणीत तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबरोबरच जळगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या स्थितीमुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहे.
या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्याची आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनावणे, अशोक खंडू बडगुजर, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, गुलाबराव कांबळे, डॉ.रमाकांत कदम, सचिन चौधरी, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, विजय बांदल, हनु पठाण, किरण ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.