जळगाव, (प्रतिनिधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे, आज, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातून १५९८ क्युमेक्स (जवळपास ५६,४३३ क्युसेक्स) इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग तापी आणि पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
धरणाची २० पैकी ४ गेट पूर्णपणे उघडण्यात आली आहेत, तर १६ गेट प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आली आहेत. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने तापी आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, पोहणे किंवा मासेमारी करणे टाळावे आणि गुरांना नदीजवळ बांधू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी स्वतःच्या आणि जनावरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.