जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात पुन्हा एकदा हत्येची घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय तरुणाची सोमवारी पहाटे ३ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशाल ऊर्फ विकी रमेश मोची असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ ही घटना घडली. माहितीनुसार, विशालवर अचानक ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात विशाल जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. विशाल मोची हा रामेश्वर कॉलनी येथे राहत होता. तो सोलर पॅनेलच्या बेस बसवण्याचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे, मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे जळगावकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.