जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील सागर पार्क मैदान येथे नुकत्याच झालेल्या महिलांच्या दहीहंडी स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत हरिजन कन्या छात्रालयाच्या ‘गोपिका’ पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. त्यांच्या या धाडसाचे आणि कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या अनोख्या सोहळ्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. स्पर्धेत रोप मल्लखांब, चित्तथरारक कसरती, आणि सांस्कृतिक नृत्यांचे अप्रतिम प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात शौर्यवीर, पेशवा, आणि वज्रनाद या ढोलपथकांतील ४१५ वादकांनी आपल्या वादनाने वातावरणात अधिक जोश भरला.
यावर्षी स्पर्धेत ११ महिलांच्या संघांनी भाग घेतला होता, ज्यात सुमारे ५०० गोपिकांचा समावेश होता. जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गोपिकांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. विजेत्या संघाला खास चषकाने गौरवण्यात आले, तसेच सहभागी झालेल्या इतर संघांनाही सन्मानित करण्यात आले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी पुढील वर्षापासून विजेत्या संघाला रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली.
या सोहळ्यात खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, जिल्हा परिषदेच्या सिईओ मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, विष्णू भंगाळे, अरविंद देशमुख, डॉ. केतकी पाटील, दहिहंडी समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी नागूलकर, प्रा.शमा सराफ, निलम जोशी, अनिता पाटील, यामिनी कुळकर्णी, सोनाली महाजन, चेतना नन्नवरे, लिना पवार, डॉ. हेमांक्षी वानखेडे, श्रीया कोकटा यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
राजेश नाईक यांच्या संकल्पनेतून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ खास सजावट करण्यात आली होती. यामध्ये सोफिया कुरेशी, व्योमा सिंग, दीपा मलिक, आणि गीता गोपीनाथ यांसारख्या प्रेरणादायी महिलांच्या कार्याला आदराने स्थान देण्यात आले होते. या अनोख्या दहीहंडी सोहळ्याने जळगावच्या सांस्कृतिक जीवनात एक नवा अध्याय जोडला आहे, जो महिलांच्या सशक्तिकरण आणि साहसाचे प्रतीक आहे.










