जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत, नाकाबंदीदरम्यान ४० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला ताब्यात घेऊन, कारसह एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री घडली. धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुधीर चौधरी, सत्यवान पवार, किशोर भोई आणि होमगार्ड निखील चौधरी हे अमळनेर चौफुली येथे रात्री १० ते १२ च्या दरम्यान नाकाबंदी करत होते. यावेळी, रात्री ११ च्या सुमारास चोपडा रस्त्यावरून येणाऱ्या एका मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारला थांबण्याचा इशारा देण्यात आला, मात्र चालकाने कार न थांबवता ती वेगाने शहरातून पळवून नेली. त्यानंतर, पोलीस अंमलदार सुधीर चौधरी आणि किशोर भोई यांनी त्या कारचा पाठलाग केला. पाठलाग सुरू असताना, कारचालकाने एचडीएफसी बँकेसमोरून गाडी वळवून पुन्हा पारोळा नाक्याच्या दिशेने रेल्वे बोगद्याकडे नेली. पोलिसांनी पाठलाग करून शोध घेतला असता, ती कार पारोळा रस्त्याजवळील एका कच्च्या रस्त्यावर बाभळीच्या झाडाच्या आड लपवलेली दिसली. मात्र, कारचालक तेथून पळून गेला होता.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात १०,१०,६०० रुपये किमतीचा, ४० किलो ४२४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. तात्काळ, धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील पवार यांना याची माहिती देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार, फॉरेन्सिक टीमसह कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली. या घटनेनंतर, पोलीस अंमलदार किशोर भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच ०१ डीपी ०२५२) आणि गांजा असा एकूण २०,१०,६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत.