अपार्टमेंटमध्ये उतरला होता विद्युत प्रवाह
जळगाव, (प्रतिनिधी) : महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी येथे बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाळत टाकलेले कपडे काढताना विजेचा धक्का लागून भावना राकेश जाधव (७१) या वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामानंद नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भावना जाधव यांचे पती आणि मुलगा कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी त्या गॅलरीतील तारेवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या. त्याचवेळी तारेत उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांना जोरदार धक्का बसला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता.
घटनेच्या वेळी घरात असलेल्या त्यांच्या मुलीला आणि सुनेला काहीतरी पडल्याचा मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी गॅलरीत जाऊन पाहिले असता, भावना जाधव जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्या. तात्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः, त्यांची मुलगी रक्षाबंधनाच्या सणासाठी काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मात्र, सणापूर्वीच आईला गमावल्याने तिला अश्रू अनावर झाले होते. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीपासूनच अपार्टमेंटमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. सकाळी भावना जाधव यांच्या नातवालाही गिझर सुरू करताना विजेचा सौम्य धक्का बसल्याचे समजते. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.