जळगाव, (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील आडगाव शिवारात चिंचोली फाट्यावर हॉटेल रायबा येथे प्रमोद बाविस्कर यांना गोळी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या करत यामागे असलेल्या पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा सूत्रधार चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर असून, राजकीय वैमनस्य आणि जुन्या वादातून हा कट रचला गेल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
१० जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्रमोद बाविस्कर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांना गंभीर जखमी करून मोटारसायकलवरून पळून गेला. यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तो उघडकीस येत नव्हता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला.
तपास कसा झाला?
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि शरद बागल यांनी दोन तपास पथकं तयार केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून नाशिक, उमर्टी आणि अडावद येथे छापे टाकले.
सूत्रधार सरपंचासह पाच जण अटकेत..
या कारवाईत पोलिसांनी खुनाच्या कटाचे सूत्रधार तथा पुनगावचे सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०), दर्शन रविंद्र देशमुख (वय २५), गोपाल संतोष चव्हाण (वय २५), विनोद वसंतराव पावरा (वय २२) आणि सुनील सुभाष पावरा (वय २२) या पाच आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली बंदूक आणि मोटारसायकलही जप्त केली आहे.
हल्ल्यामागची कारणं..
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत.
▪️जुनं वैमनस्य: प्रमोद बाविस्कर यांच्या भावाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी किशोर बाविस्कर यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
▪️राजकीय वाद: बाविस्कर आणि सरपंच किशोर बाविस्कर यांच्यात राजकीय वैमनस्य देखील होतं.
किशोर बाविस्कर यांनी शुभम देशमुख याला प्रमोद बाविस्कर यांचा खून करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शुभमने त्याच्या मित्रांसोबत मिळून रेकी करून प्रमोद यांच्या येण्या-जाण्याची माहिती काढली. उमर्टी गावातील विनोद पावरा आणि सुनील पावरा यांच्या मदतीने हा कट पूर्ण करण्यात आला. कटासाठी किशोर बाविस्कर यांनी शुभम देशमुखला फोन पे द्वारे ५० हजार रुपये दिल्याचंही तपासात समोर आलं आहे. सुदैवाने या हल्ल्यात प्रमोद बाविस्कर बचावले.
या महत्त्वपूर्ण गुन्ह्याच्या यशस्वी तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो.नि. रंगनाथ धारबळे, स.पो.नि. अजयकुमार वाढवे (यावल पो.स्टे), पो.उ.नि. शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वाल्टे, पो.हे.काँ. सुनिल दामोदरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, विलेश सोनवणे, संदीप चव्हाण, पो.कॉ. बबन पाटील, सिध्देश्वर डापकर, रावसाहेब पाटील, ईश्वर पाटील, गोपाल पाटील, चालक पो.कॉ. महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी पो.ना. किशोर परदेशी पो.कॉ. सचिन पाटील, योगेश खोंडे, भरत कोळी, सागर कोळी (सर्व यावल पो.स्टे.) यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करत आहेत.