जळगाव, (प्रतिनिधी ) : एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम गावात गालापुर रस्त्याजवळ सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून १५ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह एकूण १,२१,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत यांना जवखेडे सिम गावात काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ एक पोलीस पथक घटनास्थळी पाठवले.
पोलिसांनी घटनास्थळी पायी जाऊन पाहणी केली असता, काटेरी झुडपांच्या आडोशाला काही इसम जमिनीवर बसून पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी दुपारी ३:२५ वाजता अचानक छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत १५ जुगारींना अटक केली असून, त्यांच्याकडून जुगाराच्या डावातील ६,३९० रुपयांची रोकड आणि १,१५,००० रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. एकूण १,२१,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोकॉ दिपक देसले यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपुत, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना प्रदिप पाटील, पोकॉ समाधान तोंडे, निलेश गायकवाड, योगेश पाटील, कुणाल देवरे, दिपक देसले, लहु हटकर यांचा सहभाग होता.