जळगाव, (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीवरील बालनाट्याची ६६ वर्षांची समृद्ध परंपरा जपण्यासाठी दरवर्षी २ ऑगस्ट रोजी ‘मराठी बालनाट्य दिवस’ साजरा केला जातो. यावर्षीही बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखेने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी अनिल कांकरिया, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, सुभाष मराठे, शरद पांडे, सचिन चौघुले यांच्यासह बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात निर्गुणी बारी हिने नाट्यछटा आणि केतकी राजेश कोरे हिने ‘फुलराणी’ नाटकातील स्वगत सादर केले. यासोबतच, आषाढी एकादशीनिमित्त झालेल्या ‘संत वेशभूषा’ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
त्यानंतर शहरात बालनाट्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालय, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय आणि उत्कर्ष मतिमंद विद्यालयांनी सहभाग घेतला. या सर्व शाळांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहापासून सुरू झालेली ही दिंडी काव्यरत्नावली चौकात समाप्त झाली.
भडगाव तालुक्यातही बालनाट्य दिवसाचा उत्साह..
जळगाव शहरासोबतच भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला. स्थानिक संबळ वादन कलावंत सुनील सरदार यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित लघुनाटिका आणि नाट्यछटा सादर केल्या. माधवी सुतार हिने हेल्मेटच्या महत्त्वावर ‘जरा डोकं चालवा’ ही नाट्यछटा सादर केली. चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर, तिसरी आणि दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणावर तर पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीने पाणी बचतीवर एकपात्री प्रयोग सादर केला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यानी महाजन, माहेश्वरी पाटील, रुद्र मोरे, निलेश कोळी, विक्रांत कोळी, घनशाम माळी, पूर्वा पाटील, लावण्या कोळी, अश्वघोष पगारे, मोहिनी कोळी, मयुर सरदार, रुद्र खैरनार या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व लघुनाटिकांचे लेखन आणि दिग्दर्शन शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ गोफणे यांनी केले होते. शिक्षक मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी बालनाट्य दिवसाची माहिती दिली. सहभागी विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले, तर योगेश शुक्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले.