जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई केली आहे. काल, २३ जुलै २०२५ रोजी, उमर्टी सीमेवरील सत्रासेन नाक्यावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ४ गावठी कट्टे आणि ८ जिवंत काडतुसांसह पुणे आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली.
पोलिसांना उमर्टी नाक्याकडून सत्रासेनकडे येणाऱ्या एका मोटारसायकलवर संशय आला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पोलीस कर्मचारी रावसाहेब एकनाथ पाटील यांनी प्रसंगावधान राखत मोटारसायकल पकडली.
मोटारसायकलवरील मंथन मोहन गायकवाड (रा. पुणे) याच्या बॅगेत ३ गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतुसे, तर मागे बसलेल्या स्वप्निल बिभीषण कोकाटे (रा. धाराशिव) याच्या ताब्यात १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. ही शस्त्रे त्यांनी उमर्टी येथील एका व्यक्तीकडून ५०,००० रुपयांना घेतल्याचे सांगितले. अटक आरोपी मंथन गायकवाड याच्यावर यापूर्वीही अग्निशस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून मागील एक महिन्यापासून अवैध गावठी कट्टे विक्री रोखण्यासाठी उमर्टी आणि सत्रासेन परिसरात २४x७ नाकाबंदी लावण्यात आली आहे.