जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेतील शासकीय दिव्यांग समिश्र केंद्रात कार्यरत असलेल्या एका भौतिकोपचार तज्ज्ञाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी सुनील भागवत (वय ३८) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार, ४६ वर्षीय पुरुष असून भौतिकोपचार तज्ज्ञ तथा प्रभारी अधीक्षक वर्ग २ या पदावर कार्यरत आहेत. ते त्यांच्या जून २०२५ च्या पगाराच्या बिलावर सही करून जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, जळगाव येथे गेले होते. त्यावेळी त्यांची भेट अधिकारी माधुरी भागवत यांच्याशी झाली. माधुरी भागवत यांनी तक्रारदाराच्या पगार बिलात कोणतीही त्रुटी नसतानाही, त्यावर सही करून पुढे पाठवण्यासाठी १२,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, लाच पडताळणीत माधुरी भागवत यांनी १०,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती त्यांनी पहिला हप्ता म्हणून ५,००० रुपये आणि उर्वरित ५,००० रुपये इतर बिले मिळाल्यावर देण्यास सांगितले. आज दि. २४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. माधुरी भागवत यांनी तक्रारदाराकडून ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वतः पंचांसमक्ष स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी माधुरी भागवत यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेड पीएसआय सुरेश पाटील, पोहेकाँ/ शैला धनगर, पोकाँ/ प्रणेश ठाकूर, पोकाँ/ सचिन चाटे आदींनी कारवाई केली.