जळगाव, (प्रतिनिधी) : आईच्या मायेप्रमाणे झाडे लावा, निसर्ग जपा या भावनेतून जळगावात ‘एक वृक्ष आईच्या नावे’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पर्यावरण प्रेमी डॉ. नितीन महाजन (अप्पर जिल्हाधिकारी, अलिबाग) उद्योजक सुबोध चौधरी, अश्विन चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून भव्य वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी टेकडीवर तब्बल ५००० वृक्षांचे रोपण आणि २ लाख देशी वृक्षांच्या बिया टाकण्याचे काम करण्यात येणार असून हा कार्यक्रम २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे या जाणिवेतून “वृक्षसंपदेचा ध्यास” घेत मराठी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामध्ये करंज, कांचन, जांभूळ, शीसम, फापडा, धावडा, रेन ट्री, कदंब, उंबर, गुलमोहर, मोह, गोरख चिंच, चिंच, बेहडा, बांबू, वड, हादगा इत्यादी देशी वृक्षांचा समावेश आहे. हे वृक्ष मान्यवरांच्या हस्ते लावण्यात येणार आहेत.
कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून त्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे व आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. ॲड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रांताधिकारी विनय गोसावी, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, तहसीलदार डॉ. शितल राजपूत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे.
या वेळी मोहाडी टेकडी परिसरात दोन लाख देशी वृक्षांच्या बीजांची पेरणी करून भविष्यात ‘ऑक्सिजन पार्क’ निर्माण करण्याचा संकल्पही करण्यात येणार आहे. मराठी प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असून, “एक वृक्ष आईच्या नावे” ही संकल्पना पर्यावरण आणि भावनिक जाणीवा यांचा अनोखा संगम ठरणार आहे. या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला शहरातील सर्व वृक्षप्रेमींनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक संस्थांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी केले आहे.