जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयातून महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी २००० रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक महसूल अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शासकीय कामकाजातील गैरव्यवहाराला चाप बसला आहे.
या प्रकरणी प्रशांत सुभाष ठाकूर (वय ४९, सहायक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव) आणि संजय प्रभाकर दलाल (वय ५८, खासगी नोकर, रा. शिव कॉलनी, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार व्यक्तीने १६ जून रोजी आपल्या गावातील ग्रामपंचायत आणि सदस्यांविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाच्या कागदपत्रांच्या नकला मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. या कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी तक्रारदार वारंवार सहायक महसूल अधिकारी प्रशांत ठाकूर आणि खासगी व्यक्ती संजय दलाल यांना भेटले. त्यावेळी, नकला काढून देण्याच्या मोबदल्यात दोघांनी २००० रुपयांची लाच मागितली.
एसीबीची यशस्वी कारवाई..
या लाचखोरीची तक्रार तक्रारदाराने २३ जुलै रोजी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, संजय दलाल याने “शासकीय फी आणि झेरॉक्सचे १४०० रुपये आणि ६०० रुपये आमचे” असे म्हणत एकूण २००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तर, प्रशांत ठाकूर याने ही रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर, २३ जुलै रोजी संजय दलाल याने तक्रारदाराकडून २००० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला आणि प्रशांत ठाकूरला रंगेहात पकडले. प्राथमिक तपासानुसार, स्वीकारलेल्या २००० रुपयांपैकी ८८० रुपये शासकीय शुल्क आणि ११२० रुपये लाचेची रक्कम असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली.