नाशिक, (वृत्तसेवा) : मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत. “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे विधान त्यांनी केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
कोकाटे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हटले नसल्याचा खुलासा करत कोकाटे यांनी, आपल्या शब्दांचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते, म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही.” तसेच, “जिथे पीकच नाही तेथे शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का? ही बाब खरीच असून ढेकळं म्हणजे काय हे विरोधकांनी समजून घ्यावे,” असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी..
गडचिरोली येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. “कोकाटे काय बोलले हे मी पाहिले नाही; पण मंत्र्यांचे असे वक्तव्य दुर्दैवी आहे. दरवर्षी ५ हजार कोटी याप्रमाणे येत्या पाच वर्षांत २५ हजार कोटींची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करीत आहोत. त्यामुळे मंत्री असणाऱ्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
सुप्रिया सुळे यांच्याकडून राजीनाम्याची मागणी..
दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे. कोकाटे यांच्या या विधानाचे पडसाद आता विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.