पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील बहादरपूर येथे घराचे बांधकाम करत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका ४९ वर्षीय बांधकाम कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रकाश पंडित मोरे (४९, रा. महिंदळे, जि. धुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील संदीप हिम्मत भोई यांच्या घराच्या बांधकामासाठी त्यांचे पाहुणे प्रकाश मोरे आले होते. बांधकाम सुरू असताना त्यांचा डावा हात विद्युत तारेला लागला. विजेचा जबर धक्का लागल्याने ते खाली कोसळले.
त्यांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पारोळा पोलीस पुढील तपास करत आहेत.