जळगाव, (जिमाका) : जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बातमी! जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या आणि पॉवरलिफ्टिंग खेळाडू कोमल भाकरे यांनी कर्नाटक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावून जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.
कोमल भाकरे यांनी जिल्हा क्रीडा संकुलात नियमित आणि अथक सराव करून हे यश संपादन केले आहे. त्यांची ही कामगिरी त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची पराकाष्ठा दर्शवते, ज्यामुळे राज्यासह जिल्ह्यालाही त्यांचा अभिमान वाटत आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा विभागाने कोमल भाकरे यांना शासकीय नोकरीत सामावून घेतल्याने त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली आहे.
या यशामागे जिल्हा क्रीडा विभागाचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. कोमल भाकरे यांचे राष्ट्रीय स्तरावरील हे यश जिल्ह्यातील इतर खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.