जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीने नागरिकांना सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने दिला आहे. यासंदर्भात १५ जुलै रोजी कार्यकारी अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनी जळगाव शहरातील सामान्य नागरिकांच्या घरात पोस्टपेड स्मार्ट मीटर सक्तीने बसवत आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते की, पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कोणतीही सक्ती नाही आणि संमतीशिवाय मीटर बसवल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात.
दरम्यान कंत्राटदारांचे कर्मचारी ग्राहकांवर सक्ती करत आहेत आणि स्मार्ट मीटर न बसवल्यास जुन्या मीटरची रीडिंग घेण्यासाठी येणार नाही, अशी धमकी देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मागणी केली आहे की, स्मार्ट मीटर हे जनतेवर अन्यायकारक आणि आर्थिक पिळवणूक करणारे असल्याने ते बसवण्यास बंदी घालावी. ज्या ग्राहकांना पूर्वी दोन महिन्यांचे बिल २००-३०० रुपये येत होते, त्यांना आता महिन्याला १२००-१३०० रुपये बिल येत आहे. स्मार्ट मीटरमुळे रीडिंग पाचपट जास्त दाखवल्याच्या तक्रारी देशभरात असल्याने, सामान्य ग्राहकांचे बिल महिन्याला ४-५ हजार रुपये येऊ शकते. त्यामुळे महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याचा हा ‘गोरखधंदा’ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजु मोरे, संग्राम सुर्यवंशी, डॉ. रिझवान खाटीक, रिंकु चौधरी, आकाश हिवराळे, चेतन पवार, नईम खाटीक, गोटु चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.