जळगाव, (प्रतिनिधी) : गणवेश योजनेतून काही विद्यार्थी वंचित राहिल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर शिक्षण विभागाने खुलासा करत स्पष्ट केले आहे की, गणवेश वाटप प्रक्रियेत कोणतीही गडबड किंवा अपूर्णता नाही.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत गणवेश योजनेसाठी २०२३-२४ च्या यू-डायस (U-DISE) माहितीच्या आधारे मंजूर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार गणवेशाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. आतापर्यंत पात्र विद्यार्थ्यांपैकी ९८% विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणवेश वाटप करण्यात आले आहे.
प्रभारी शिक्षण अधिकारी सचिन परदेशी यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष सुरू होताना लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी वाटली असली तरी, आता संख्येत हळूहळू स्थिरता येत आहे. तालुकास्तरावर विद्यार्थ्यांच्या गणवेश समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया २५ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच १००% गणवेश वितरण प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.