जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव मतदार संघाच्या खासदार स्मिता वाघ यांना नवी दिल्ली येथे ‘सी एस आर टाईम्स’ संस्थेतर्फे ‘संसद भारती पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. लोकसभेतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि मतदारसंघातील सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १५ जुलै रोजी १२व्या राष्ट्रीय सी. एस. आर. संमेलनात प्रदान करण्यात आला. ‘विकसित भारत मिशन २०४७ मध्ये सी एस आर ची भूमिका’ या विषयावर आधारित या संमेलनात देशभरातील धोरणकर्ते, उद्योजक, सी एस आर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ‘सी एस आर टाईम्स’ संस्थेने प्रथमच राजकीय क्षेत्रातील, विशेषतः संसदेत थेट निवडून आलेल्या एका महिला खासदाराला हा पुरस्कार दिला आहे. संसदेतील सक्रिय सहभाग, लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेली भूमिका आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची सखोल दखल घेऊन श्रीमती वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना खासदार स्मिता वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे, सहकाऱ्यांच्या अखंड सहकार्यामुळे आणि वेळोवेळी नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला आहे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व नेत्यांचे आभार मानले.
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर मान्यवर, धोरणकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला.