जळगाव, (जिमाका) : जळगाव जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याचे जतन करत शाश्वत इकोटुरिझम (Ecotourism) विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील वन पर्यटन स्थळांचा विकास, पर्यावरणपूरक सोयीसुविधांची निर्मिती आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.
▪️निसर्ग समृद्ध पर्यटन स्थळांचा विकास..
जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गिरणा नदी परिसर, हतनूर धरण परिसर, सातपुडा डोंगररांगा आणि विविध जैवविविधतेने नटलेले भाग ही प्रमुख निसर्ग पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. यामध्ये बायोटॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सायकल ट्रॅक, निसर्ग शिबिरे, माहिती फलक आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा प्रचार यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल.
▪️समन्वय आणि रोजगार निर्मितीवर भर..
या उपक्रमांमध्ये वन विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्यात मजबूत समन्वय साधण्यावर सहमती दर्शवण्यात आली. विशेषतः स्थानिक युवकांना इकोटुरिझम मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे, होम-स्टे (Home-stay) योजनेतून रोजगार निर्मिती करणे, तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
▪️जळगाव बनेल ‘हरित पर्यटन’ मॉडेल..
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “जळगावच्या निसर्गसंपदेचे संवर्धन करण्यासोबतच त्याचा शाश्वत उपयोग करून रोजगार आणि अर्थकारण वाढवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे.” या बैठकीत सर्व सहभागी घटकांनी दिलेल्या सूचना आणि उपाययोजनांमुळे इकोटुरिझम धोरण अधिक प्रभावी आणि वास्तववादी बनण्यास मदत झाली.
जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकारातून लवकरच काही प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे जळगाव जिल्हा ‘हरित पर्यटन’ क्षेत्रात एक आदर्श मॉडेल म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.