चोपडा, (प्रतिनिधी) : चोपडा येथील महालॅबने एका महिलेला किडनी निकामी झाल्याचा (किडनी फेल) चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी डॉ. उमेश कोल्हे यांना सोमवारी (१४ जुलै) निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एक महिला आजारी असल्याने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे रिपोर्ट तपासल्यावर महालॅबने तिला किडनी फेल झाल्याचे सांगितले. मात्र, संबंधित महिलेने इतरत्र तपासणी करून खातरजमा केली असता, तिला किडनीचा कोणताही गंभीर आजार नसल्याचे स्पष्ट झाले.
या गंभीर घटनेची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी तातडीने महालॅबची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. समितीमध्ये डॉ. सागर पाटील, डॉ. पवन पाटील आणि डॉ. तृप्ती पाटील यांचा समावेश होता. या समितीच्या अहवालानुसार तसेच महालॅबचे जिल्हा समन्वयक धीरज पानपाटील यांच्या अहवालानुसार, डॉ. उमेश कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सोमवारी काढण्यात आले.
दरम्यान, भाजप शहराध्यक्ष आणि तक्रारदार नरेंद्र पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महालॅबमध्ये रुग्णांच्या रक्ताच्या चाचणी अहवालावर डिजिटल सह्या करून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या महालॅब यंत्रणेची चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली. ते आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन डॉ. कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.