जळगाव, (प्रतिनिधी) : आई-वडील आणि मुलांचे भावनिक नाते खूप महत्वाचे असते. या नात्यातील पालकांप्रती असणाऱ्या आदराचा मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. कुटुंबातील विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमळ वातावरणामुळे त्यांची सर्वांगिण वाढ चांगली होती. याच विचार डोळ्यासमोर ठेवून गुरुपौर्णिमेला (दि.१० जुलै) बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे बालकांच्या जीवनातील पहिले गुरु आईवडील म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करण्याकरिता त्यांचा पाद्यपूजनाचा सोहळा नाट्यरंग कला व संगीत अकादमी येथे आयोजित करण्यात आला होता.
शहरातील बालकांच्या विकासाकरिता बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेनुसार छोट्या छोट्या उपक्रमातून बालकांच्या बौध्दिक विकासासोबतच आदर्श भावनिकतेचाही विकास व्हावा हा उद्देश साध्य करण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नाट्यरंग कला व संगीत अकादमीतील १५ बालकांनी व त्यांच्या पालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या सोहळ्याला बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यानंतर पालकांबद्दल आमचा आदरभाव अधिक दृढ झाल्याची भावना सहभागी बालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी मानले. पाद्यपूजन सोहळा यशस्वीतेसाठी नाट्यरंगच्या अध्यक्षा दिशा ठाकूर, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, दिपक महाजन, मोहित पाटील, सुरेखा मराठे, रिषभ पाटील आदींनी परिश्रम घेतले.