जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री सुरू असल्याच्या तक्रारींनंतर जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (दि. ९) एकत्रितपणे धडक कारवाई करत १३४ गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईत सुमारे १४.४८ लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आणि रसायन जप्त करण्यात आला. या संयुक्त कारवाईत ३,३८५ लिटर गावठी दारू आणि २०,१५० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले, ज्याची एकूण किंमत १४,४८,६६२ रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईचा तपशील :
▪️पोलिस विभागाची कारवाई: पोलिसांनी एकूण ९९ गुन्हे नोंदवले. यात २,८४५ लिटर हातभट्टी दारू आणि ५,६३० लिटर रसायन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ६,१२,३८२ रुपये आहे.
▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: या विभागाने ३५ गुन्हे नोंदवले. ५४० लिटर गावठी दारू, १४,५२० लिटर रसायन आणि अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक चारचाकी वाहन असा एकूण ८,३६,२८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर यशस्वी कारवाईत निरीक्षक डी. एम. चकोर, अशोक तारू, भरारी पथकाचे निरीक्षक मोमीन, चोपड्याचे निरीक्षक किशोर गायकवाड आणि चाळीसगावचे राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली. यापुढेही हातभट्टी दारूविरुद्धची मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.