जळगाव, (जिमाका) : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी, जळगाव येथे दिनांक ९ जुलै ला दोन अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वीपणे पार पडल्या. या शस्त्रक्रियांचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील (सामान्य रुग्णालय जळगाव) व वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे (जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पहिल्या शस्त्रक्रियेमध्ये दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचे आधी दोन सिझर झाले होते आणि गर्भपिशवी मूत्रपिंड व इतर अवयवांशी चिकटली होती. अशा परिस्थितीत मोठ्या जोखमीची ही शस्त्रक्रिया डॉ. रोहन पाटील (एम.एस. सर्जरी, पियुष हॉस्पिटल) व डॉ. चंदन महाजन (एम.डी., हर्षगोप हॉस्पिटल) यांनी अत्यंत कुशलतेने व यशस्वीरीत्या पार पाडली.
तर दुसऱ्या शस्त्रक्रियेत स्त्रीच्या गर्भाशयाजवळील ९x७ सेंमी गाठ जी आजूबाजूच्या अवयवांना चिकटली होती, ती डॉ. रोहन पाटील यांनी यशस्वीरीत्या काढून टाकली. या दोन्ही शस्त्रक्रियांना डॉ. नरेंद्र ठाकूर (एम.डी. अॅनेस्थेसिया), डॉ. सुनील तायडे व डॉ. किरण सोनवणे यांनी योग्य ती भूल देऊन अतिशय सुरक्षिततेने पार पाडण्यात मदत केली. या शस्त्रक्रियेमध्ये संगीता शिंगारे (अधिसेविका), वैशाली पाटील (शस्त्रक्रिया परिसेविका), तुळसा माळी व नम्रता नागापुरे (अधिपरिचारीका), तसेच शस्त्रक्रिया विभागातील कक्षसेवक व सर्व सहकारी कर्मचारी यांनीही यशस्वी अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली.
या रुग्णालयात आतापर्यंत ३० हून अधिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या आहेत. यामध्ये गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स, हर्निया दुरुस्ती अशा शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात येतात. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. किरण पाटील व डॉ. किरण सोनवणे यांनी केले आहे.