जळगाव, (प्रतिनिधी) : प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच घेताना जनता शिक्षण मंडळाच्या धनाजी नाना विद्यालयाची मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (वय ५७) आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) धुळे युनिटने रंगेहात पकडले. ही कारवाई ७ जुलै रोजी करण्यात आली.
या प्रकरणी एका ६१ वर्षीय पुरुषाने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदारांची सून जनता शिक्षण मंडळाच्या धनाजी नाना विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तिने प्रसूती रजेसाठी २ जून २०२५ रोजी वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज केला होता. तक्रारदाराने मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांची भेट घेऊन सुनेच्या रजेच्या अर्जाबाबत विचारणा केली असता, मुख्याध्यापिकेने प्रति महिना ५,००० रुपये याप्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी एकूण ३०,००० रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने ७ जुलै २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर, त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना ६,००० रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी एकूण ३६,००० रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर, ७ जुलै रोजी सापळा कारवाईदरम्यान, मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी तक्रारदाराकडून ३६,००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. त्यांनी ही रक्कम कनिष्ठ लिपिक आशिष पाटील याला मोजण्यासाठी दिली असता, दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या सापळा पथकात पो. नि. रूपाली खांडवी, पो.हवा. राजन कदम, पो. हवा. मुकेश अहिरे, पो. हवा. पावरा, पो. कॉ. रामदास बारेला, चा. पो. हवा. मोरे, चा. पो. कॉ. बडगुजर (सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट) यांचा समावेश होता.