जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर येथील गोविंद नगरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घराशेजारील पत्राच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश अनिल गोल्हारे (वय १८) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या घटनेमुळे पहूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश हा जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण घेत होता. पहूर पेठ येथील गोविंद नगरात तो आपल्या आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महेशने अचानक घराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये गळफास घेतला.
कुटुंबीयांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. महेशच्या अकाली निधनाने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहूर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. महेशसारख्या उमद्या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.