चाळीसगाव, (प्रतिनिधी): चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संशयास्पद अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ पोलिसांनी केवळ १२ तासांत उकलले आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने घरातून नेऊन जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरदड, धुळे) या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
अकस्मात मृत्यू ते खुनाचे प्रकरण..
२९ जून रोजी कन्नड घाटात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ मृताच्या अंगावरील वस्तू आणि खुणा यांच्या आधारे सोशल मीडियावर माहिती प्रसारित करून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आले आणि मृत व्यक्ती धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील जगदीश जुलाल ठाकरे असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, जगदीश ठाकरे यांच्या हरवल्याची तक्रार धुळे तालुका पोलिस ठाण्यात दाखल होती.
पत्नीच्या तक्रारीने उकलले गुढ..
जगदीश ठाकरे यांची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. अरुणा ठाकरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाला जाण्याचे कारण सांगून जगदीशला घरातून नेले. त्यानंतर त्यांनी जगदीशचा खून करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
पोलिसांची तात्काळ कारवाई आणि आरोपींना अटक..
पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पथकांनी अत्यंत वेगाने तपासचक्रे फिरवली. अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, जगदीश ठाकरे यांचा गोळी झाडून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या तपासकार्यात पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि प्रदीप शेवाळे, पोउपनि राहुल राजपूत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शेखर डोमाळे, पोकॉ. महेश पाटील, भूषण शेलार व चालक बाबासाहेब पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.