जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांनी जळगाव शहराच्या विविध भागांमध्ये तब्बल २४ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा वापरल्याचे समोर आले आहे. यामुळे, पोलिसांनी ज्या भागात या नोटा वापरल्या गेल्या, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
या बनावट नोटा प्रकरणाचा छडा २७ जून रोजी लागला. स्थानिक गुन्हे शाखेने सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४) आणि सचिन संजय गोसावी (वय २३) या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ हजार रुपये किमतीच्या १२ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. चौकशीदरम्यान, या दोघांनी यापूर्वीच २४ हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्याची माहिती उघड झाली, ज्यामुळे पोलीस आता त्या नोटांचाही शोध घेत आहेत.
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी विजय प्रभुलाल माहोरे (वय ३८) यालाही अटक केली. माहोरेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथील कोकिळा रघुनाथ मंगरुळे (वय ४०) या महिलेकडून घेतल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कोकिळा मंगरुळेला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.
या बनावट नोटांच्या रॅकेटचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांच्या व्यवसायात गुंतलेल्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.