जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील असोदा रस्त्यावर गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय-३८) या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जावेद जाकिर पटेल (वय-२९) हा गंभीर जखमी झाला आहे.
असोदा येथील रहिवासी असलेले मोहम्मद इब्राहिम खाटीक आणि जावेद जाकिर पटेल हे दोघे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने जळगाव शहराकडे येत होते. धनाजी पेट्रोल पंपाजवळ खारी डोह येथे एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोहम्मद इब्राहिम खाटीक यांच्या छातीवरून चारचाकीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. इब्राहिम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. मोहम्मद इब्राहिम खाटीक यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मोहम्मद खाटीक यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.