जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दहशत पसरवणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्यानंतर, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) याला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे.
बुधवारी, दि.२ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, फुलगाव शिवारातील फुलगाव फाट्याजवळ एक इसम गावठी कट्ट्यासह फिरत आहे. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख आणि पो.अं. रवींद्र चौधरी यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली.
पथकाने फुलगाव फाट्याजवळील पुलाजवळ सापळा रचून केशव उर्फ सोनू सुनील भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७,५००/- रुपये किमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल) आणि पाच पितळी धातूची काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान, केशव उर्फ सोनू सुनील भालेराव हा वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.