जळगाव, (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलिसांनी मंगळवारी दि.०१ जुलै रोजी छापा टाकत, देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक केली आहे. याप्रकरणी ‘पिटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सात ग्राहकांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गांधलीपुरा परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या. या तक्रारींच्या आधारे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खासगी वाहनातून येऊन अचानक छापा टाकला. या कारवाईत वेगवेगळ्या घरांमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आला.
या कारवाईत डीवायएसपी विनायक कोते यांच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, महिला होमगार्ड आणि इतर पोलीस अधिकारी सहभागी होते.