लालसिंग पाटील | भडगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव, घुसर्डी आणि पासर्डी येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. यामुळे भडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून एकाही गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नाही.
दि.२६ जूनच्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी कजगाव येथील गजबजलेल्या राणा पॉइंट चौकातील सुदर्शन भिला अमृतकर यांच्या घरावर डल्ला मारत मोठ्या प्रमाणात रोकड चोरली. त्यानंतर, तीन किलोमीटर अंतरावरील पासर्डी येथील भारत नगरमधील अर्जुन विठ्ठल पाटील यांच्या घरातून वीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याव्यतिरिक्त, घुसर्डी येथील बळीराम हरी जाधव आणि निवृत्ती भास्कर देवकर यांच्या घरांमध्येही चोरट्यांनी हात साफ करत रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. एकाच रात्रीत चार घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे.
या घरफोड्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती मशागत आणि खत-मजुरीसाठी शेतकऱ्यांनी सुरक्षित ठेवलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आता खत आणि मजुरीचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत शेतकरी पडले आहेत. परिसरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक आणि विशेषतः शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून चोरट्यांना पकडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.