जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावरील हल्ला हा अपघात नसून, खुनाचा पूर्वनियोजित प्रयत्न असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.
भालगाव रस्त्यावर घडली होती घटना..
दिनांक १४ जून रोजी दशरथ महाजन यांच्यावर एरंडोल-भालगाव रस्त्यावर हल्ला झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता, मात्र दशरथ महाजन यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका कल्पना दशरथ महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजकीय मतभेदामुळे हा घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले सत्य..
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तपास सुरू केला. वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचणी आल्या. मात्र, पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे आणि राहुल कोळी यांनी अथक प्रयत्न करून, एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे सलग ८ तास परीक्षण केले. या फुटेजमुळेच आरोपी निष्पन्न झाले आणि हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले.
पूर्ववैमनस्यातून हल्ला, बोलेरो कार जप्त..
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत, संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९) आणि पवन कैलास महाजन (वय २०, सर्व रा. एरंडोल) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतारकडून जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
पथकाचे कौतुक..
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहवा/हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवी कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोशि प्रशांत पाटील यांनी केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येते.