जळगाव, (प्रतिनिधी) : एका फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने रचलेला कट जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. दुचाकी विक्री करणारा एजंट आणि मूळ मालकाला हाताशी धरून दुचाकी चोरीची खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
जळगाव एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना २४ जून २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की, यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथील अशोक हिरामण मोरे याच्याकडे चोरीची मोटारसायकल आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोहेकॉ प्रीतमकुमार पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील आणि पोकॉ प्रदीप सपकाळे यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत मोरेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी मोरेकडे चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासे केले. सुमारे ५ वर्षांपूर्वी त्याने रावेर येथील जुन्या वाहन खरेदी-विक्रीचा एजंट जफर शेख उस्मान याच्यामार्फत प्रमोद निलेश कोळी यांच्या मालकीची मोटारसायकल (मूळ क्रमांक एमएच १९/डीके ०७५५) १६,०००/- रुपये रोख देऊन विकत घेतली होती. या व्यवहारामागे फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याचा कट होता. प्रमोद निलेश कोळी याने बजाज फायनान्सकडून कर्ज घेऊन ही मोटारसायकल घेतली होती आणि त्याचे हप्ते अजून बाकी होते.
कटानुसार, अशोक मोरेला विकलेल्या या मोटारसायकलला दुसरा बनावट आरटीओ क्रमांक (महाराष्ट्र १९/सीसी ६६४०) लावला होता. त्यानंतर प्रमोद कोळी याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ही मोटारसायकल चोरीला गेल्याची खोटी तक्रार (दि. ३० डिसेंबर २०१९)ला दिली होती. एजंट जफर शेख उस्मानने या व्यवहारात कमिशन म्हणून २,०००/- रुपये घेतले होते.
सखोल तपासानंतर, पोलिसांनी या कटातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यात मोटारसायकल विकत घेणारा अशोक हिरामण मोरे (वय ३९, रा. दगडी मनवेल, ता. यावल), मोटारसायकल खरेदी-विक्री करणारा एजंट जफर शेख उस्मान (वय ३४, रा. रावेर, ह.मु. जाम मोहल्ला, भुसावळ), आणि बनावट फिर्याद देणारा प्रमोद निलेश कोळी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) यांचा समावेश आहे. जप्त केलेली मोटारसायकल पुढील कार्यवाहीसाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.