जामनेर, (प्रतिनिधी) : येथील डॉ. स्नेहल रावते यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. १६ जून रोजी गोंदेगावनजीक भरधाव डंपरने धडक दिल्याने डॉ. रावते यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा सीसीटीव्ही पुरावा नसतानाही, शेंदुर्णीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे यांच्या पथकाने अथक तपास केला.
या तपासामध्ये, पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाची मदत घेतली. घटनास्थळावरील नमुने आणि टायर मार्क्सच्या आधारे तपास करत, पोलिसांनी अपघातात सामील असलेला डंपर (एमएच १९ ईके ४१०२) शोधून काढला. हा डंपर धनराज मोरे (रा. टहाकाळी ता. जामनेर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
अपघात झाल्यापासून फरार असलेल्या डंपर चालक सुनील बिसन रेस्वाल (रा. रावळा ता. सोयगाव जि. छ. संभाजीनगर) याला पोलिसांनी १९ जून रोजी सकाळी ५ वाजता अटक केली आहे. दुसरा संशयित आरोपी, हेल्पर सुरज यादव (रा. झारखंड) मात्र अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या कारवाईत पहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे, पोशी गुलाब पवार आणि नरेश घाडगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.