पाचोरा, (प्रतिनिधी) : येथील सुपडू भादू पाटील विद्यालयात बुधवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास रवींद्र भरत महाले (वय ४३) या शिक्षकाने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मधल्या सुटीनंतर विद्यार्थी वर्गात परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाले (रा. दहिगाव संत, ह.मु. पाचोरा) हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेत आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास मधल्या सुटीत सर्व विद्यार्थी आहार घेण्यासाठी वरच्या मजल्यावरून खाली गेले असता, महाले यांनी वरच्या मजल्यावर असलेल्या वर्गखोलीत छताला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सुटीनंतर मुले वर्गात परतताच त्यांना महाले लटकलेल्या अवस्थेत दिसले. हा हृदयद्रावक प्रकार पाहून विद्यार्थी आणि इतर शिक्षकांची एकच धावपळ उडाली. शाळेतील शिक्षकांनी तात्काळ महाले यांना खाली उतरवून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रवींद्र महाले यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असून, महाले यांनी एक दिवस आधीच तिला घरी बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. शाळा सुरू असताना शिक्षकाने अचानक वर्गखोलीत आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच संस्थेचे चेअरमन संजय वाघ आणि संचालक मंडळाने घटनास्थळी पाहणी केली. पाचोरा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.