जळगाव, (प्रतिनिधी) : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने जळगाव येथील एका शेअर दलालाला मिरज तालुक्यातील लिंगनूर येथे बोलावून तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी, ‘पोलिस आले’ अशी बतावणी करून आरोपींनी दलालाकडून रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणी, लिंगनूर येथील सराईत गुन्हेगार लक्ष्मण नाईक याच्यासह सात जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव येथील शेअर दलाल यश दिलीप रडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव, सध्या रा. पुणे) यांना लक्ष्मण नाईक याने संपर्क साधला होता. नाईकने त्याच्याकडे स्वस्तात सोने उपलब्ध असल्याचे सांगून यश रडे यांना लिंगनूर येथे बोलावले. सुरुवातीला सोने उपलब्ध नसल्याचे सांगून नाईकने त्यांना परत पाठवले. मात्र, मार्च महिन्यात नाईकने पुन्हा यश रडे यांना संपर्क साधत सोने उपलब्ध असल्याचे आणि रोख रक्कम घेऊन येण्यास सांगितले.
यश रडे २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन लिंगनूर येथे पोहोचले. तेथे शेतात सोने दाखवत असतानाच, अचानक पोलिसांच्या वेशात दोघे अनोळखी व्यक्ती आले. यामुळे सर्वजण तेथून पळून गेले. या गोंधळात लक्ष्मण नाईकने सोने आणि रक्कम पोलिस घेऊन गेल्याचे भासवले आणि तुमची रक्कम परत मिळवून देतो, असे सांगून यश रडे यांना जळगावला परत पाठवले. यश रडे यांनी महिनाभर पैशांसाठी नाईककडे पाठपुरावा केला, परंतु नाईक टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यश रडे यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी, लक्ष्मण नाईक (रा. लिंगनूर), प्रेम, राजेश, शिवा, एक कानडी भाषा बोलणारा व्यक्ती आणि पोलिसांच्या वेशात आलेले दोन अनोळखी अशा सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने खरेदीसाठी आणलेले २५ लाख रुपये ‘पोलिस’ असल्याचा बनाव करून आरोपींनी लांबवले. लक्ष्मण नाईक हा कर्नाटकात बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असून, यापूर्वीही त्याच्यावर चोरी आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलिस करत आहेत.