जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील कलाप्रेमींसाठी एक अनोखा कलाविष्कार अनुभवण्याची संधी घेऊन, प्रसिद्ध चित्रकार सचिन मुसळे यांची विद्यार्थिनी सानिका भन्साळी हिचे ‘रंग सपना’ हे भव्य एकल चित्र प्रदर्शन पी. एन. गाडगीळ गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, १९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता या प्रदर्शनाचे थाटामाटात उद्घाटन होणार आहे.
सानिकाने तिच्या मनातील विविध रंग आणि आकारांना कॅनव्हासवर अतिशय सुंदरपणे उतरवले आहे. हे प्रदर्शन प्रेक्षकांना तिच्या कलात्मक दृष्टिकोनातून एक मनोहर विश्व पाहण्याची संधी देईल, जिथे प्रत्येक ब्रशस्ट्रोकमध्ये तिचे कलेवरील प्रेम आणि भावनांचा आविष्कार जाणवेल.
या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, डॉ. इंद्राणी मिश्रा, परिवर्तनचे अध्यक्ष रंगकर्मी शंभू पाटील, मीनल जैन, चित्रकार सचिन मुसळे, आणि गिरीश डेरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही कलात्मक मेजवानी गौरव भन्साळी व नेहा भन्साळी यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून साकारली गेली आहे. सानिकाच्या ‘रंगसृष्टी’तून प्रेक्षकांना एक नवा दृष्टिकोन आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. कला आणि भावनांचा हा सुंदर संगम अनुभवण्यासाठी सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन गौरव भन्साळी यांनी केले आहे.