जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाउंडेशन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, तसेच जळगाव बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन परिसरात हे कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगावचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन व मदन लाठी यांचे विशेष योगदान लाभले. उपक्रमांचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण रक्षणाविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हे होते.
महात्मा गांधी उद्यानात पर्यावरणावर सुसंवाद..
सकाळी साडेसात वाजता महात्मा गांधी उद्यानात पर्यावरण व निसर्ग विषयक सुसंवाद साधण्यात आला. यावेळी करणसिंग राजपूत यांनी संवाद साधला, तर मदन लाठी यांनी उपस्थितांना पर्यावरण शपथ दिली.
गांधी रिसर्च फाउंडेशनकडून जनजागृती..
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक कॅरिबॅगच्या वापराचे दुष्परिणाम आणि कापडी पिशव्यांच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित करणारे पथनाट्य सादर केले. या सादरीकरणात मदन लाठी, सुधीर पाटील, प्रशांत सूर्यवंशी व विक्रम अस्वार यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी मदन लाठी यांनी पर्यावरण शपथ दिली व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर प्रबोधन..
जळगाव रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डवर प्रवाशांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. करणसिंग राजपूत, सुधीर पाटील आणि मदन लाठी यांनी प्रवाशांना मार्गदर्शन केले व कापडी पिशव्यांचे वाटप केले. उपस्थितांना पर्यावरण शपथही दिली. जळगाव रेल्वे स्थानकावर राजेंद्र सूर्यवंशी, विजय पाटील, संदीप गायकवाड, अतुल भाऊसर, नामदेव लाखे, नामदेव बारी, शंकर मोरे, तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, विक्रम असवार, प्रशांत सूर्यवंशी व समाधान महाजन यांचा सहभाग होता. रेल्वे प्रशासनाकडून अरुणकुमार नाफडे (उप स्टेशन व्यवस्थापक), धर्मवीर सिंग (मुख्य आरोग्य निरीक्षक), कांतिलाल कनाडे (हाउसकीपिंग सुपरवायझर), राजीव यादव (कार्यालय अधीक्षक), प्रफुल्ल खर्चे (SI, RPF), मिलिंद तायडे (आरक्षक, RPF) यांची उपस्थिती होती. एसटी स्टॅण्डवर आयोजित कार्यक्रमातही मदन लाठी यांनी पर्यावरण शपथ दिली, उज्ज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर आणि आगार व्यवस्थापक संदीप पाटील आदींचा सहभाग होता.