भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकेगाव येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या दिवंगत मित्राच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमातून जमा झालेली ४१,००० रुपयांची रक्कम त्यांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत १ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील झोडगे येथे जाऊन स्वर्गीय सुधाकर फुलशिंग सोनवणे यांच्या परिवारास सुपूर्द केली.
सुधाकर सोनवणे हे साकेगाव येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होते, परंतु वडिलांच्या बदलीमुळे त्यांना साकेगाव सोडावे लागले होते. २८ वर्षांनंतर त्यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी गेट-टुगेदर आयोजित करण्याची योजना आखली होती. मात्र, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सुधाकरची इच्छा पूर्ण करण्यासाठी, १९९८-९९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या तारखेलाच गेट-टुगेदर घेऊन निधी गोळा केला. या उपक्रमात अनेक माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनीही योगदान दिले, ज्यामुळे एकूण ४१,००० रुपये जमा झाले.
कुटुंबाची सद्यस्थिती:
सुधाकर यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी वैशाली, मोठी मुलगी ईश्वरी (इयत्ता ८ वी), दुसरी मुलगी धैर्या (इयत्ता ४ थी), लहान मुलगा हसराज (इयत्ता २ री) आणि विवाहित भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असल्याने, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सुधाकर यांच्यावर होती. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाला कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
जमा केलेली रोख रक्कम देण्याऐवजी, साकेगावच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपने सुधाकर यांचा सर्वात लहान मुलगा, हसराज, याच्या नावाने ४१,००० रुपयांची एफडी (मुदत ठेव) करण्याचा निर्णय घेतला. यामागे भविष्यात त्याच्या शिक्षणासाठी ही रक्कम उपयोगी पडावी, हा उद्देश होता. इंदिरा गांधी विद्यालयाच्या दहावीच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोलाची साथ दिली. ‘एक हात मदतीचा’ या अंतर्गत भविष्यातही असेच कार्य करत राहण्याचा निर्धार ६० सदस्यांच्या या ग्रुपने केला आहे. त्यांनी सुधाकरच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर थोडे का होईना, हास्य आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही मदतीचे आश्वासन दिले आहे.