जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात श्री महेश नवमी उत्सव २०२५ निमित्त मंगळवारी दुचाकी रॅली जळगाव शहरातून काढण्यात आली. या रॅलीने जळगाव वासीयांचे लक्ष वेधून घेतले. महिला-पुरुष यांचेसह सर्व समाजबांधवांनी पारंपारिक वेशभूषांमध्ये लक्षणीय सहभाग दिसून आला.
श्री माहेश्वरी समाज उत्पत्ती दिनानिमित्त शहरात श्री महेश नवमी उत्सव २०२५ साजरा होत आहे. सोमवारी दि. २ जून रोजी सकाळी १० ते ३ या वेळेमध्ये विसनजी नगर परिसरात प्रेमाश्री रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये समाजबांधवांची नेत्र, दंत, मधुमेह, रेटीनोपॅथी स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. यात डॉ. धीरज बडाले व डॉ. प्रीती बडाले यांनी ३५४ नागरिकांची तपासणी केली.
मंगळवारी दि. ३ जून रोजी सकाळी ९ वाजता आदर्श नगर परिसरातील महादेव मंदिरात महाआरती झाली. यावेळी समाजबांधवांनी भगवान महादेवाचा जयघोष करीत उत्साह साजरा केला तर संध्याकाळी ५ वाजता रिंग रोडवर असणाऱ्या श्री महेश चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली ख्वाजमिया चौक, शिवतीर्थ चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, एम. जे. कॉलेज मार्गे पुन्हा महेश चौकात विसर्जित झाली.
रॅली समाप्तीवेळी दीप महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तसेच महेश वंदना सादर करण्यात आली. यानंतर संध्याकाळी ७ वाजता माहेश्वरी बोर्डिंग या ठिकाणी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. भजन संध्या कार्यक्रमांमध्ये विनोद बलदवा आणि पवन झंवर यांनी भक्तीगीते सादर केली. भाविकांनी मंत्रमुग्ध होत भक्तीगीत श्रवण करण्यात आनंद घेतला. कार्यक्रमांसाठी श्री माहेश्वरी युवा संघटन तसेच माहेश्वरी समाजातील विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन परिश्रम घेतले.