जामनेर, (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघ, जामनेर यांच्या वतीने आज एकुलती बु. (ता. जामनेर) आणि दोंदवाडे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. एकुलती येथील कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना “गीतजागर” आणि “मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले” ही प्रेरणादायी पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. यावेळी इयत्ता सातवीतील नीरज वारंगणे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दीपक ढोणी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या विकृतीकरणावर चिंता व्यक्त केली. त्यांनी महाराजांच्या आरतीच्या माध्यमातून होणारे दैवतीकरण थांबवण्याचे कळकळीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी केले, तर दीपक पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.