धुळे, (प्रतिनिधी) : शहराच्या वलवाडी शिवारात भारतीय सैन्यदलात क्लार्क असलेल्या कपिल बागुलने पत्नी पूजा (वय ३८) हिचा पेस्टिसाईडचे इंजेक्शन देऊन खून केल्याचे उघड झाले आहे. कपिलचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती पत्नीला झाल्याने त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी पती कपिलसह त्याची आई, बहीण आणि प्रेयसी अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे.
कपिल आणि पूजा यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता आणि त्यांना ९ वर्षांची मुलगी व ७ वर्षांचा मुलगा आहे. कपिलचे जयहिंद महाविद्यालयात शिकत असताना प्रज्ञा नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्प्यात असून, काही वर्षांपूर्वी कपिल आणि प्रज्ञा पुन्हा एकत्र आले होते.
गुरुवारी सायंकाळी कपिलने पूजाला बळजबरीने पेस्टिसाईडचे इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि दीड तासाच्या आत तिचा मृत्यू झाला. पूजाचा भाऊ भूषण महाजन याला कपिलने फोन करून पूजाच्या मृत्यूची माहिती दिली. भूषण तातडीने धुळ्यात दाखल झाला. दरम्यान, देवपूर पश्चिम पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पूजाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
पूजाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, कपिल पूजाला नेहमी मारहाण करत असे. यासंदर्भात पूजाने यापूर्वी जळगाव येथील महिला आयोगाकडे तक्रारही केली होती, परंतु नंतर लग्न तुटू नये म्हणून ती मागे घेण्यात आली होती. पोलिसांनी कपिल बागुल, त्याची आई विजया बाळू बागूल, बहीण रंजना धनेश माळी (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि प्रेयसी प्रज्ञा कार्डिले यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.