चाळीसगाव, (प्रतिनिधी) : साडेनऊ कोटी रुपयांचा तोटा असणाऱ्या जिल्हा दूध संघ आज सुस्थितीत असून, गत तीन वर्षात हा तोटा भरून काढत संघ नफ्यात आल्याने दूध उत्पादकांना प्रतिलिटर ७० पैसे दरवाढ देत ६ कोटी ६२ लाख रुपयांचे वाटपही केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रविवारी गुजरातमधील आणंद येथे सहकार भारतीतर्फे आयोजित राष्ट्रीय डेअरी अधिवेशनात दिली.
या अधिवेशनाला देशभरातील दूध चळवळीशी संबंधित अभ्यासक, दूध संघांचे चेअरमन यांनी हजेरी लावली होती. या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. डेअरी क्षेत्रातील आव्हाने व उपाययोजना यावर विचार व्यक्त केले.
यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र चौरसिया, राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील, राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांच्यासह जळगाव जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष सुधीर पाटील, महामंत्री शशिकांत बेहेडे, सचिव विकास देवकर आदी उपस्थित होते. तीन लाख लिटर दूध प्रोसेसिंग आणि पॅकिंग करण्याकरिता स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. प्रक्रिया करूनही उत्पादने बनविली जातात, असे ते म्हणाले.
एनडीडीबीने १९९५ला संघाचा कारभार हातात घेतल्यानंतर अल्पकाळातच दिलेले सर्व कर्ज फेडून संघ सुस्थितीत आणला. २०१५मध्ये एनडीडीबीकडून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे याचे कामकाज सुपूर्द केले गेले. त्यानंतर येथे आधुनिक दूध प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. डिसेंबर २०२२ला आम्ही कारभार हाती घेतला तेव्हा साडेनऊ कोटी रुपयांचा तोटा होता. हा तोटा भरून काढत संघाला फायद्यात आणले. संघ नफ्यात येताच दूध उत्पादकांना ७० पैसे प्रतिलिटर वाढीव दर दिल्याची माहिती मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.