भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिंदी येथे २२ वर्षीय तरुणाने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आकाश अशोक चव्हाण (वय २२, रा. शिंदी ता. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश पुणे येथे काम करून शिक्षण घेत होता. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे शिंदी गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाशने काही दिवसांपूर्वी विषारी औषध घेतले होते. त्यानंतर त्याला भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने रविवारी भुसावळ येथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. जळगाव येथे दाखल केल्यानंतर मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आकाश हा आई, लहान बहीण आणि आजोबांसोबत राहत होता. त्याची आई मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह चालवत असे, तर बहीण शिक्षण घेत होती. आकाश स्वतः पुणे येथे काम करून आपले शिक्षण पूर्ण करत होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.