यावल, (प्रतिनिधी) : शहरापासून जवळच असलेल्या यावल-विरावली रस्त्यावर मंगळवार दि. २० मे रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास भरधाव स्कुल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील काकू आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशा जितेंद्र येवले (वय ३०) आणि विशाल कुशल येवले (वय २२, दोन्ही रा. कोरपावली ता. यावल) असे मयत काकू व पुतण्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास निशा येवले आणि विशाल येवले हे दोघेही दुचाकीवरून कोरपावली येथून यावलकडे काही कामानिमित्त जात होते. यावलपासून जवळ असलेल्या कृषी फलोत्पादन केंद्राजवळील समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूल बसने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, निशा येवले आणि विशाल येवले या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच यावल आणि विरावली गावातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. येवले कुटुंबातील दोन सदस्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरपावली गावात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.