एरंडोल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भातखंडे येथे बुधवार दि.१४ मे रोजी विवाह सोहळा आनंदात पार पडला. लग्न घरात आनंदाचे वातावरण असताना मात्र नववधू आजारी पडल्याने व गंभीर आजारात हळद फिटण्याआधी म्हणजे लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी मृत्यू झाला. लग्नघरात आनंदाच्या ठिकाणी शोकाकुल वातावरण झाले.
लक्ष्मी मुकेश जगताप (वय २०) असे मयत तरुणीचे नाव आहे. भातखंडे येथील माणिक रामदास जगताप यांचा मुलगा मुकेश जगताप (वय २६) हा खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचा विवाह सुरत येथील स्व. विजय भगवान ठाकरे यांची कन्या लक्ष्मी हिच्याशी ठरला. लक्ष्मीला वडील व भाऊ नसल्याने गरिबाघरची मुलगी जगताप परिवाराने निवडली. लग्नाची तारीख ठरली. त्याप्रमाणे लक्ष्मीची आई मीनाबाई आणि नातेवाईक ११ मे रोजी भातखंडे येथे पोहोचले. दि.१२ रोजी मेहंदी, दि.१३ रोजी हळद आणि मिरवणूक अशा पारंपरिक सोहळ्यांचे आयोजन उत्साहात झाले. मात्र दि.१४ मे रोजी विवाह सोहळ्याच्या दिवशी दुपारी अचानक चक्कर येऊन लक्ष्मी खाली कोसळली. त्यावेळी गावातील डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार करण्यात आले आणि लग्न समारंभ पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी दि.१५ मे रोजी लक्ष्मीची प्रकृती बिघडल्याने तिला एरंडोल व नंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
तपासणीनंतर लक्ष्मीला न्यूमोनिया आणि कावीळ असल्याने निदान झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. शनिवारी दि. १७ मे रोजी पहाटे ५ वाजता तिचा मृत्यू झाला. दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाइकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना अचानक स्मशानशांतता पसरली. लक्ष्मीला वडील आणि भाऊ नाहीत. आई आणि दोन बहिणी असा तिचा परिवार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. शनिवारी सायंकाळी भातखेडे येथेच लक्ष्मीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे एरंडोल तालुक्यात शोककळा पसरली आहे.