जळगाव, (प्रतिनिधी) : शारीरिक व्यंगावर मात करत सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात अविरत सेवा देणारे आरोग्यदूत मुकुंद गोसावी आता रक्तदानासाठी जनजागृती करणार आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने त्यांची ‘मिशन सिंदूर’ अंतर्गत रक्तदानासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी नुकतीच ही घोषणा केली.
उन्हाळ्यातील रक्तटंचाई आणि ‘मिशन सिंदूर’चे महत्त्व लक्षात घेता, थैलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्तक्षयग्रस्त रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना नियमित रक्तपुरवठा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रशासनासोबत आरोग्य विभागही रक्त संकलनासाठी सक्रिय आहे.
रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी स्वतः १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. ते नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात आणि त्यांच्या कार्यामुळे सुदृढ समाजाला प्रेरणा मिळते. त्यांच्या याच कार्याची दखल घेत, शहरासोबत ग्रामीण भागातही रक्तदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोरोना काळातही मुकुंद गोसावी यांनी दिव्यांग असूनही मोटरसायकलवरून रुग्णांची सेवा केली होती. यासोबतच ते कोरोना लसीकरण कार्यक्रमाचेही स्टार प्रचारक होते. आता ‘मिशन सिंदूर’साठी ते रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत, ज्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकेल.